Monday, May 20, 2013

पांडेश्वरचे शिवमंदिर

२० मे २०१३

 


अष्टविनायकांपैकी एक असलेला मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी थांबण्याचे हे माझे आवडते ठिकाण. बारामती - मोरगावमार्गे सासवड या रस्त्यावर मोरगावाचे हे मंदिर आहे. या पूर्वीही या मंदिराविषयी लिहिले आहे. गाडी पार्किंगसाठी या ठिकाणी मोठे स्वतंत्र पटांगण असून, गाडी पार्किंगच्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असल्याचे दिसून आले. मयुरेश्वराचे दर्शन घेऊन गाडी पार्किंगच्या ठिकाणी हे शंकराचे छोटे मंदिर आहे. मंदिर तसे छोटेच पण बाहेरील कलाकुसरीवरून छान वाटले. इतर मंदिराच्या मूर्तीप्रमाणे द्वारपालाच्या मूर्तींचे नुकसान झाल्याचे येथे दिसते. हे द्वारपाल आहे की कुठल देव ते समजले नाही. परंतु या दोन्ही द्वारपालांचे चार हात असून, चारही हातात आयुधे आहेत. एका हातात शस्त्र, दुसºया मागील हातात शंख व तिसºया हातात चक्र आहे. अन्य हात मूर्तीभंजकांनी तोडले आहे. दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे, कंबरेला कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, डोक्यावर नक्षीदार सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी त्यांची रचना आहे. शेजारीच पाच अन्य मूर्ती या मूर्तीपेक्षा लहान आकारात कोरलेल्या दिसून येतात. याही मूर्ती थोड्याप्रमाणात तोडल्या गेल्या आहेत. मुख्य मंदिरात मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. गाभाºयात शंकराची पिंड असून, दर्शनी भागावर सिंहाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. छोटासा पण कोरीवकाम असलेला नंदी आहे.
      मंदिराला कळस नाही. मुस्लिम राजवटीत बहुधा याही मंदिराला तडाखा बसल्याचे दिसून येते. नंतरचे बांधकाम १८ ते १९ व्या शतकात केल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या स्थानिक दुकानदारांकडे चौकशी केली असता मंदिर शंकराचे असून, बाकी माहिती माहित नसल्याचे सांगण्यात येते. शंकराचे दर्शन घेऊन पुढे पांडेश्वरला जाण्यास निघालो. 





द्वारपाल




  पांडेश्वरचे शिवमंदिर

पुण्यापासून अंदाजे ४५ किलोमीटरवर असणारे सासवड हे शंकराच्या मंदिरासाठी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. निरा, बारामती, मोरगाव या गावांना जाण्यासाठी येथूनच जावे लागते. श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक नारायणपूर किंवा अष्टविनायकापैकी एक असणाºया मोरगावच्या मोरेश्वरला जातात. परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास प्राचीन वास्तुकला पहावयास मिळते. अर्थात पांडेश्वर हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करेलच असे नाही. परंतु ज्यांना प्राचीन मंदिरे व वास्तूकला पाहण्याचा नाद आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण छान आहे. 
           सासवड येथून कऱ्हा नदी वाहत येते. या नदीच्या काठावर प्राचीन काळी शिवमंदिरे बांधली गेली. नदीच्या काठी गावे वसली गेली व काठावर मोठे घाट बांधून शिवशंकराची मंदिरे उभारली गेली. असेच एक शिवशंकराचे प्रसिद्ध व जुने मंदिर पाहण्यासाठी मोरगाव येथून मयुरेश्वराचे दर्शन घेऊन थोडी वाट वाकडी करून पांडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजून गेले होते. सूर्यास्ताला काही वेळ शिल्लक होता. थोडी हिंम्मत करून पांडेश्वरकडे जाणाºया डांबरीरोडवरून गाडी पुढे नेली. काही अंतरावरच चांगला डांबरी रस्ता संपला व सुरू झाला दगडी व काही काळानंतर सुधारेल असा दगडी रस्ता. तब्बल दोन एक किलोमीटर या छोट्याश्या रस्त्यावरून आम्ही निघालो होतो. वाटेत गाडी पंक्चर होण्याची मनात भीती होती. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. अन्यथा या नवख्या ठिकाणी अवघडच होते. १५ ते २० मिनिटांनी दगडी रस्ता संपवून काही अंतरावरून पांडेश्वराचे मंदिर दिसले. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पांडेश्वर गावातून रस्ता जातो. गावाच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांना रस्ता विचारल्यानंतर थेट असेच पुढे जा असे त्यांनी सांगितले. येताना रस्ता खूपच खराब होता असे सांगितल्यावर सासवड-नाझिरे मार्गे सुद्धा येता येते असे गावकऱ्यांनी सांगितले. 
गाव प्राचीनकाळचे असल्याचे येथील काही अवशेषावरून दिसून येते. मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड आहे.

 

मंदिराच्या रस्त्यावर असलेली प्राचीन नागप्रतिमा व वीरगळ.


मंदिराच्या समोरील मनोरा

मंडपातला नंदी

मनोºयाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस असलेल्या पायºया

मुख्य मंदिर : 

           या मंदिराला शिखर, दगडी मंडप, नदीकाठी तट, मराठाकालीन भित्तीचित्रे, मुस्लिम राजवटीचे बांधकाम असा साज चढवत हे मंदिर पूर्णात्वास गेल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या कालावधीत मंदिराचा जिर्णोद्धार झालेला येथील मंदिराच्या बांधकामावरून लक्षात येते. मंदिरातील विटा चौथ्या शतकात, नंतर सतराव्या व अठराव्या शतकात मंदिराचे जोडकाम झालेले दिसते.  हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर आहे. 
          वनवासात असताना पांडवांनी हे शिवलिंग स्थापन केल्याची लोकांची मान्यता आहे. गाभाºयात भव्य शिवलिंग आहे. इतर मंदिरात जमिनीवर शिवलिंग दिसून येते. मात्र, या ठिकाणी अंदाजे ५ फूट बाय ५ फूट कोरलेल्या दगडावर हे शिवलिंग आहे. मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील आयताकृती छताचा सभामंडप आहे. 
इतर मंदिरांप्रमाणेच मुस्लिम राजवटीत व परकीयांच्या अतिक्रमणांमुळे मंदिरातील मूर्ती वाचू शकल्या नाही. अन्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसणारे द्वारपाल या ठिकाणी दिसून येतात. अंदाजे पाच फुटी असलेले दोन द्वारपाल सुंदर व कोरीव शिल्पे असल्याचे दिसून येते. काही प्रमाणात या मूर्तींची तोडफोड झाल्याचे याही ठिकाणी दिसून येते. या मूर्तीचे मूळचे देखणेपण आपल्याला प्राचीन दगडी कोरीवकामाबद्दल कुतूहल निर्माण करते. दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे, कंबरेला कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, डोक्यावर नक्षीदार निमुळता होत जाणारा मुकूट, त्यापाठीमागे चक्र व मुकुटावर सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी त्यांची रचना आहे. मंदिरात मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. मंदिराच्या समोरीला बाजूस दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार खिडक्या फुलाफुलांची नक्षी कोरलेली आहे.

द्वारपाल



मंदिराचा अंतर्भाग

 मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे

तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती

इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना

धनुधार्री वीराची मूर्ती


     पांडवकालीन मंदिर : 

       तब्बल सोळाशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असणाºया मंदिराला काहीना काही इतिहास असतोच. असाच इतिहास येथील पांडेश्वर मंदिरालाही आहे. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभारल्याने या मंदिराला ‘पांडेश्वर’ असे म्हणतात अशी लोकसमजूत आहे.  मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान मंदिरे बांधलेली दिसली. या छोट्याखानी मंदिरात मूर्ती नसून त्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर येथे नाही. मंदिराच्या समोरच आवारात एका धर्नुधारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला दिसतो. तिलाच अजुर्नाची मूर्ती असल्याचे येथील तरुणांनी सांगितले. मंदिराच्या समोर मुंबईतील कापड गिरणीला असलेल्या चिमणीसारखा मनोरा दिसतो. मजा म्हणजे या मनोºयाच्या आत पायºया असून, वर जाता येते. पण मनोºयाची स्थिती पाहता वर न गेलेले बरे. हा मनोरा कशासाठी बांधला गेला हे समजत नाही. मनोºयाच्या वरती कोरीव काम केल्याचे दिसून येते. मंदिराच्या समोरच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची मूर्ती कोरलेली आहे. 


मंदिर परिसर : 

               मंदिराचा परिसर शांत व सुंदर आहे. उन्हाळा असल्यामुळे शेजारून वाहणाºया कºहा नदीच्या पात्रात दगड, कचरा, मोठाले धोंडे, गवताशिवाय काहीच नव्हते. या नदी पात्राला नदी म्हणणे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. या नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख दिशेला हे मंदीर आहे. मंदिराला कºहा नदीच्या बाजूने एक मोठा तट बांधलेला आहे. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही काळात झालेले असल्याचे येथे असणाºया तरुणांनी सांगितले. तटाच्या आतल्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालची बाजू  मुस्लिम शैलीत बांधलेली कमानीची रचना असलेली आहे.  तट चांगला रूंद असून आजूबाजूचा परिसर दिसतो. पावसाळ्यात नदी वाहत असल्याने हा परिसर खूपच छान दिसेल. 

कसे जाल :

  • सासवड ते पुणे हे अंतर 34 कि.मी.
  • सासवडपासून पांडेश्वर मंदिर अंदाजे 25 किमी. तर जेजुरीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. 
  • सासवडे नाझिरे मार्गे सुद्धा येथे पोहचता येते. सासवडवरून भुलेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग मुख्य चौकातून आहे. भुलेश्वर येथून 27 किलोमीटर अंतरावर आहे. 


आजुबाजूची प्रेक्षणीय स्थळे : 

नारायणपूर, जेजुरी, संगमेश्वर,  वटेश्वर (चंगावटेश्वर), सिध्देश्वर, केतकावळे, मोरगाव, भुलेश्वर, थेऊर

Thursday, May 16, 2013

‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री


‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री

पुण्यात ऐतिहासिक, धार्मिक स्थळे तशी खूप आहेत. अशा ऐतिहासिक स्थळापैकीच वानवडची महादजी शिंदेची छत्री आहे. ‘द ग्रेट मराठा’ म्हणून इंग्रज इतिहासकारांनीही ज्यांची स्तुती केली त्या महादजी शिंदेंची छत्री (समाधी) पाहण्यास  आवर्जुन                     गेलो त्या विषयी....


सकाळी ११ वाजता समाधी मंदिराजवळ पोचलो. गावातील काही मुले येथे क्रिकेट खेळताना दिसली.  प्रवेशद्वारावर ५ रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून समोर असलेले मंदिर पाहण्यास निघालो.


महादजींचा मृत्यू पुण्याजवळ    

महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे शके १७१५ च्या माघ शुद्ध १३ रोजी (१२ फेब्रु. १७९४) वयाच्या ६७ व्या वर्षी झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पुण्यातील वानवडीजवळ ‘महादजी शिंदे छत्री’ उभारण्यात आली आहे. सुमारे तेरा हजार चौ.मी. क्षेत्रावर समाधी, छत्री व मंदिरासाठी एकूण चारशे चौ.मी.चे बांधकाम केल्याचे दिसून येते. समाधीच्या आतील बाजूने पंधरा फूट उंचीची संरक्षक दगडी भिंत उभारण्यात आली आहे. 




मंदिर परिसर : 

        वानवडीतील या समाधीजवळ येताच प्रथम दर्शनी आपल्याला दिसते ते  मंदिराच्या समोरील छोटेसे मारुतीचे मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे.  या स्मारकाची उभारणी भव्य दगडी चौथºयावर करण्यात आलेली आहे. आवारात घुमट असलेले समाधीचे बांधकाम आहे. ही एक वेगळी छोटीशी चौकोनी इमारत आहे. ही इमारत मात्र बंदच ठेवलेली दिसली. दरवाज्यामधनू आतील समाधीचे दर्शन होते. तेथे महादजींचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. 
        जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर उभारलेले आहे. सुंदर कलाकुसर असलेली ही वास्तू सर्व बाजूंनी कोरीवकाम, नक्षीदार घुमटने सजवलेली आहे.  मुख्य मंदिर १७१५ मध्ये बांधण्यात आले नंतरची वास्तू १९१५ मध्ये वाढविण्यात आली. राजस्थानी शैलीने बांधकाम केलेली ही वास्तू, 'वास्तू-हर' शास्त्रानुसार उभारली आहे. मंदिरावर ऋषी-मुनींचे पुतळे पिवळ्या खडकातून कोरलेले आहेत. तीनही बाजूंनी भव्य नक्षीकाम केलेली बाल्कनी केलेली आहे. या बाल्कनीमध्ये जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने नक्षीचा लोखंडी जिना केलेला आहे. सध्या येथे जाण्यास परवानगी नाही. मंदिराचा हॉल प्रशस्त असून त्यात महादजी शिंदे घराण्यातील पुरुषांचे पेंटिग्ज लावलेले आहेत. ग्वाल्हेरचे सिंदिया घराण्यातर्फे ट्रस्ट मार्फत या स्थळाची देखभाल केली जाते. मंदिराच्या छतावर चित्रकला करण्यात आली आहे. महादजी शिंदे यांचा बैठ्या स्थितीतला पुतळा, छोटा संगमरवरी नंदी आहे. 

महादजी शिंदे परिचय : 

        महादजी शिंदे यांचा जन्म राणोजींच्या पत्नी चिमाबाई यांची पोटी १२ एप्रिल १७३० मध्ये  झाला. महादजी शिंदे हे मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार होते. आपल्या तलावारीच्या बळावर महादजींनी हिंदुस्थानभर दरारा निर्माण केला होता. 
        महादजी शिंदे (सिंधिया) तसेच पाटिल बाबा म्हणून प्रसिद्ध होते. महादजींचे  नाव मराठ्यांच्या इतिहासात मुत्सद्दी सेनानी म्हणून घेतले जाते. शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण त्यांच्यात होते. इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जाते. साताºयाजवळील कन्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. ग्वाल्हेरचे संस्थान शिंदे यांचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हे या संस्थानेचे संस्थापक पुरुष होते. महादजी राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले. महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले.भव्य पायदळ, पाचशे तोफा व एक लाख घोडदळ असे महादजी शिंदे यांचे लष्कर होते. पानिपतची लढाई, पुण्याजवळील लोणावळ्यातील वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसºया लढाईनंतर मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. मराठी साम्राज्याला पूर्ववैभव मिळवून देण्याचे काम महादजींनी केले. इंग्रज, मुघल व स्वकीयांच्या विरुद्ध ते लढले. 
        पानिपतावर झालेला मराठ्यांचा पराभव व त्यानंतर झालेली मराठेशाहीची दुरवस्था याचा कलंक धुऊन काढण्यासाठी महादजींनी आपले जीवन खर्च केले. पुण्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या वडगावच्या लढाईत महादजींनी ब्रिटिशांच्या  'इष्टुर फाकडा' या सेनानीचा पराभव  केला. भारतात ब्रिटीशांचा झालेला हा एकमेव पराभव आहे.  

महादजींची वर मालिका :

        महादजींच्या आयुष्यावर कथा, कादंबºयांप्रमाणेच टिव्ही मालिका ही तयार झाली. लहानपणी ही मालिका माझ्या आवडीची होती.   दिग्दर्शक संजय खानला यांनी महादजींवर ‘दी ग्रेट मराठा’ ही मालिका काढली. शाहबाज खान, मुकेश खन्ना, परीक्षित साहानी यांनी या मालिकेत काम केले होते. मालिकेच्या व्हिसीडी सुद्धा उपलब्ध आहेत. सुरेश देसाई यांनी लिहिलेले ‘महायोद्धा’ हे पुस्तक सुद्धा छान आहे. 
एकदा तरी या सुंदर ऐतिहासिक स्थळला भेट द्यायलाच हवी.










 

हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी ४ ओळी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 

कसे जाल : 

  • पुणे कँपच्या पलीकडे पुणे मिलिटरी कँपमध्ये एएफएमसी लागते. त्याच रस्त्याने पुढे जातांना डाव्या बाजूला वानवडीसाठी फाटा फुटतो.  तेथे महादजी शिंदे चौक आहे.
  • रेसकोर्सहून हडपसरकडे जातांना बिगबाजारपाशी उजव्या हाताला वळल्यावर तो रस्ता वानवडीमधूनच जातो.
  • पुणे दर्शन बस डेक्कन जिमखाना येथून सुटते. पाताळेश्वर, शनिवारवाडा, टिळक संग्रहालय, पुणे विद्यापीठ, चतु:श्रुंगी, डॉ. आंबेडकर संग्रहालय, केळकर संग्रहालय, सारसबाग, कात्रज सर्प उद्यान, महादजी शिंदे छत्री, महात्मा फुले स्मारक, आदिवासी संग्रहालय, आगाखान पॅलेस अशी दर्शन बस आहे.

  • प्रवेश फी : भारतीयांसाठी ५ रु.  
  • परदेशी पर्यटकांसाठी : २५
  • साप्ताहिक सुट्टी : पुणे दर्शनामध्ये समावेश असल्याने सुट्टी नाही. 

Wednesday, May 8, 2013

विज्ञानाची जिज्ञासा जागविणारे ‘सायन्स सेंटर’

‘सायन्स सेंटर’  

        मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरला काहीच महिन्यांपूर्वी भेट देऊन आलो होतो. याच सायन्स सेंटरच्या उपक्रमातून पिंपरी-चिंचवडलाही सायन्स सेंटर उभे राहीले आहे. घरापासून केवळ दोन किलोमीटरवर असलेले हा महापालिकेचा प्रकल्प पाहण्यासाठी निघालो. त्या विषयी....

           विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्या कलागुणांना आणखी वाव निर्माण होऊन ते समृद्ध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथे आटो क्लस्टरजवळ विज्ञान केंद्र विकसित केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील हे पहिलेच विज्ञान केंद्र आहे.
            आपल्या प्रत्येकाच्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल व जिज्ञासा असते. एखादी गोष्ट कशी कार्य करते, ती तशीच कार्य का करते, मोटार कार, टू व्हिलर कशी सुरू होते. ती कार्य कशी करते याचे या ठिकाणी लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही हाताळून पाहता येते. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत असणाºया नॅशनल काउंसिल आफ सायन्स म्युझियमच्या सहायाने हे केंद्र विकसित केले आहे.  ध्वनींचे तरंग उठविणारे काष्ठरंग, लांब नलिकांमधून येणारे ध्वनी, वजन मोजण्याची नवी समतोल पद्धत, समुद्रातील परिदर्शी आणि कोण बोलतो आहे, हे सांगणारे दोन पुतळे. अशी जादूई वैज्ञानिक खेळणी या ठिकाणी सायन्स पार्कच्या बाहेरील मोठ्या बगीच्यामध्ये उभारलेली आहेत.
          केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत  ८ फेब्रुवारी २०१३ ला झाले. अंदाजे सात एकर क्षेत्रात हे सायन्स पार्क उभारले आहे. प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे उभारलेले आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेली पण जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभारलेली येथे खेळणी आहेत. त्यात प्रतिध्वनीचा अनुभव देणारी भव्य नलिका आहे. लांबवर असणाºया दोन पुतळ्यांमधून आपलाच आवाज कसा ऐकायला येतो. ‘योयो’, कुजबुजणारी बाग, वजन पाहण्याची समतोल पद्धती, विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळेही येथे बसविले आहेत. असेच पुतळे मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये  ही आपणास पाहावयास मिळतात.
         मुख्य इमारत दुमजली आहे. त्यात चार दालने असून, इमारतीत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस पहिले दालन आहे. तेथे मानवाची निर्मितीनंतर त्यात कसे काळानुसार कसे बदल होत गेले. याची प्रतिकृती साकारलेली आहे. चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती आहे. इस पूर्व १५० मध्ये हेरॉनने वाफेवर चालणाºया यंत्रांचा लावलेला शोध आणि पुढे त्यावरील यंत्रांची झालेली निर्मिती याचेही दर्शन घडते. १८८५ मध्ये विकसित केलेली सायकल, त्यानंतर आलेली मोटार सायकल, चारचाकी गाडी असा २०१३ पर्यंतच्या वाहन उद्योगाचा मोठा फोटो येथे लावलेला आहे.







डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे





विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळे








चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती





दुसरे दालन हे आटो मोबाईल दालन आहे. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनाचे इंजिन कसे असते. मोटार कशी चालते. याच्या खºया प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही प्रतिकृतींना लहान मुलांना हात लावण्यास परवानगीही आहे. गिअर कसे पडतात, टू व्हिलर कशी काम करते. नॅनोचे इंजिन कसे बनवले आहे. बाहेरून छान वाटणारी गाडीच्या आतमध्ये कसे असते. गाडी चालविण्याचा अनुभव कसो येतो. त्यांची कार्ये काय याची जाणीव हे दालन देते. वाहनउद्योगाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला आहे.
दुसºया मजल्यावर गेल्यानंतर समोरच ऊर्जा दालन आहे, सौर, इलेक्ट्रिक, वाफेवरील उर्जांचा उपयोग कसा केला आहे, याची माहिती हे विविध खेळण्यांच्या माध्यमातून दिली आहे. विविध छोटे मॉडेल पाहून छान वाटते. शेजारील दालनामध्ये धड गायब झालेला माणूस,  दोनशे फुट खोल विहीर (दृष्टीभ्रम) हवेत तरंगण्याचा अनुभव, भास घडविणारी दुर्बिण, विविध प्रकारचे आरश्यांमध्ये आपली दिसणारी खुजी व उंच, जाड अशी प्रतिकृती पाहून मजा येते.
चौथे दालन थ्रीडी थिअटरचे आहे. मी गेलो तेव्हा ते काही कारणांमुळे बंद होते. तेथे मुंबईतील नेहरू तारांगणाप्रमाणे अवकाशातील तारे, ग्रह यांचा थ्रीडी चित्रपट दाखवितात.























मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर ज्यांनी पाहिले असेल त्या पेक्षा हे वेगळे आहे. तेथील काही खेळण्यांप्रमाणे येथेही काही खेळण्यांचा इतक्या लवकर (उद्घाटन ८ फेब्रुवारी २०१३ ) ‘सत्यानाश’ झाल्याचे पाहून मन दु:खी होते. काही वैज्ञानिक खेळण्यांची बटन दाबून देखील ते सुरू होत नसल्याने बच्चे कंपनी नाराज होते. परंतु लहान मुलांना विज्ञानाची आवड लावण्यासाठी एकदा जरूर या सायन्स पार्कला प्रत्येकाने आवश्य भेट द्यावी.
  • तिकीट दर : प्रौढांसाठी ५० रुपये, लहान मुलांसाठी ३० रुपये.
  • प्रत्येक सोमवारी बंद
  • वेळ : सकाळी १० ते ५.३० 
  • पाहण्यासाठी लागणारा वेळ :  निवांत असला तर अख्खा दिवसही . घाईत पाहत असला तर दोन तास तरी. 
  • जायचे कसे : पुण्याहून पिंपरी-चिंचचवडला स्वत:चे वाहन अथवा बसने येता येते. चिंचवड स्टेशनच्या येथून यु टर्न घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेकडे जाण्यास निघावे. डाव्या बाजूला सायन्स पार्ककडे जाण्याचा फलक दाखविला आहे.
    दुसरा मार्ग : पिंपरी महापालिकेच्या येथून मोरवाडी कोर्टाकडे जाणाºया मार्गावरून मोहननगरकडे जाणाºया रस्त्यावर डावीकडून वळूनही जाता येते.  
आपल्या प्रतिक्रिया या ब्लॉगवर आवश्य लिहा...
नेहरू सायन्स सेंटर

कॉपी करू नका