नागेश्वर मंदिर
‘‘नागेश्वर मंदिराचे बांधकाम इ. स. तेराव्या शतकाच्या जवळपास झालेले असून, संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेवांच्या अभंगांमध्ये नागेश्वर मंदिराचा उल्लेख असल्याने या मंदिराच्या प्राचिनत्वाची ओळख पटते.मंदिराच्या प्राचीन मूळ लहान दगडी मंदिराचा जीर्णोद्धार वेळोवेळी अगदी पेशवाई काळापर्यंत झालेला आहे. या मंदिराचा सभामंडप १७ व्या शतकात बांधण्यात आला असून, मराठा वास्तूशैलीची वैशिष्ट्ये त्यामध्ये आढळतात. सभामंडपावरील छतास सुंदर कोरीव नक्षीकाम असून, सुरूदार खांब व महिरपीमुळे मंदिर व परिसर सौंदर्यपूर्ण झालेला आहे. पेशवाईतील सावकार आबा शेलूकर यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून, महाद्वारे, नगारखाना, सिमाभिंत इ. बांधकामे त्या काळात झालेली आहेत.
चार ते पाच फूट गर्भगृह व त्यामध्ये मोठे शिवलिंग व त्यावर गोलाकार वैशिष्ट्य पूर्ण दगडी बांधकामातील छत अशी वास्तूवैशिष्ट्ये असलेल्या या मंदिराच्या परिसरात शनि, विठ्ठल, रुक्मिणी, विष्णू, दत्त गणेश या देवदेवतांची मंदिर मूर्ती या स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. पुजाºयांसाठी निवासस्थान, दीपमाळा, मंदिरास उंच शिखराबरोर असलेली उपशिखरे इ. सह. येथील शांतता व त्यामुळे निर्माण झालेले पर्यावरण इ. वैशिष्ट्यांमुळे ‘मंदिर वास्तू समूह म्हणून नागेश्वर मंदिराचे मूल्य अतिशय वेगळे आहे. मूळ सातशे वर्षांपूर्वीचे यादवकालीन मंदिर व त्यावेळचा निसर्गरम्य परिसर यामध्ये आता अमूलाग्र बदल झालेला आहे. मंदिराच्या भोवती दाट वस्ती झाली व मूळ मंदिराचाही चेहरा मोहरा बदलला गेला.
काळानुरूप अनेक बदल झालेले हे मंदिर शिल्प पुरातत्व खात्याने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेले आहे. अशा या प्राचीन मंदिर परिसरात स्वच्छता व शांतता राखावी व वास्तूचे पावित्र्य जतन करावे.’’
पूर्वी पुण्याला पुनवडी म्हणत असत गावाच्या वेशीबाहेर नाग नदीच्या काठावर (सध्याचा नागझरी नाला) नागेश्वराचे मंदिर असल्याचा होते. हे मंदिर सातशे वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे कीर्तन करीत असत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ही मंदिरात येऊन अभिषेक केला आहे. काशी यात्रेला जाण्यापूर्वी या मंदिराचे दर्शन घेऊन जाण्याची पूर्वी परंपरा होती.
मुख्य गर्दीच्या रस्त्यापासून काहीश्या आत असलेल्या या मंदिराबाबत अनेकांना नाव ऐकूनही माहिती नाही. भगवान शंकराचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. मंदिरापासून जवळच असलेल्या लाल महाल पाहण्यास निघालो.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.