महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला? यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Sunday, September 25, 2022
Wednesday, June 8, 2022
हरिहरेश्वर- दिवेआगर
लॉकडाउनमुळे गेली दोन वर्षे कुठे बाहेर हिंडायला जमले नाही. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस समुद्रकिनाºयावर हिंडण्यासाठी हरिहरेश्वर- दिवेआगर हे ठिकाण नक्की केले. दोन दिवसांत हा परिसर निवांत पाहून आलो त्या पर्यटनाविषयी....
सकाळी ६.३० ला पुण्याहून ताम्हीणीघाटमार्गे जाण्यासाठी निघालो. वाटेत जोशी वडेवाल्यांकडे नाष्टा करून पुढचा प्रवास सुरू केला. शनिवार व रविवार सोडून प्रवास असल्यामुळे गर्दी नव्हती. नाहीतर या घाटात वाहतुककोंडीमध्येच अडकायला होते. पूर्वी हा घाट रस्ता फारच खराब होता. मात्र, सरकारच्या कृपेने सिमेंटचा पक्का रस्ता तयार झाला होता. काही ठिकाणी दुहेरी वाहतूक होईल असे रस्ते बांधल्याने प्रवास सुखकर होतो. वाटेत कैरी, जांभुळ, करवंदे असा रानमेवा घेऊन आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी बसलेली कातकरी माणसं रस्त्याच्या कडेला दिसत होती. चार पैसे मिळतील या आशेने हे लोक येथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उन्हात बसलेली असतात. त्यांच्याकडून रानमेवा घेऊन पुढचा प्रवास सुरू केला.
उंचच उंच डोंगर, खाली खोल दरी, वेडीवाकडी वळणे, प्लस व्हॅली पाहत ताम्हीणी घाट मार्गे विले भागाड एमआयडीसीतून हा रस्ता खाली उतरतो. पावसाळयात या ठिकाणी मनमोहक धबधबे असतात. तासगाव, निझामपूर, माणगावमार्गे म्हासळाला पोहचलो. पांगळोली येथून जस्वली मार्गे आम्ही हरिहरेश्वरला गेलो. जस्वली येथून डावीकडे एक रस्ता दिवेआगरला जातो.
दुपारचे १२ वाजले होते. तसे पुणे ते हरिहरेश्वर हे अंतर ३ तासांचे परंतु वाटेत ठिकठिकाणी थांबत गेल्याने वेळ वाढला.
हरिहरेश्वर-
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. ‘दक्षिण काशी’ म्हणून रायगड जिल्ह्यातील हे ठिकाण ओळखले जाते. एक दोन दिवसांच्या सुट्टीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन-हरिहरेश्वर ही गावे पर्यटकांत लोकप्रिय आहेत. वर्षभर या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक येतात. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसºया बाजुला समुद्र यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असे दोन्हीही होतात. येथील समुद्रकिनाºयावर पूर्वजांना पिंडदान करण्याचे धार्मिक कार्यक्रम होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे या परिसरात आहेत. तसेच समुद्रकिनारी असणारे गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, विष्णुपद, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. मंदिर जरी समुद्र किनाºयावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरुन व शेवट समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी येथे प्रथा आहे. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाºया प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायºया खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात.
मात्र, आम्हाला ते भाग्य लाभले नाही. मंदिर व्यवस्थापनाने जून ते सप्टेंबर असे ४ महिने हा मार्ग बंद केल्याचा फलक आम्हाला मंदिरासमोरच दिसला. त्यामुळे आमचा हिरमोड झाला. मंदिरात शिवशंकराचे दर्शन घेतले. काही वेळ समुद्राच्या लाटा पाहण्यात गेल्या. प्रदक्षिणा मार्ग बंद असला तरी प्रदक्षिणा जेथे संपते त्या ठिकाणाहून थोडे अंतर जाता येते. मात्र, आम्ही पोहचलो तेव्हा भरती असल्यामुळे हा मार्ग पूर्ण पाण्याखाली गेला होता. दुपारचा १ वाजला होता. भूकही लागली होती त्यामुळे हा नाद सोडून आम्ही जेवाणासाठी मंदिर परिसरात असलेल्या घरगुती हॉटेल्सकडे वळालो. येथे १२० रुपयांना थाळी होती. जेवण करून पुन्हा मंदिर परिसरात असलेल्या कैलासपती झाडाच्या सावलीत बसलो. कैलासपतीचे फुल खूपच सुगंधी, दिसायलाही सुंदर. ओहोटी लागण्यास अजून २ तास होते. दुपारी ४ वाजता ओहोटी सुरू झाली. एव्हना समुद्र सुद्धा शांत होत होता. प्रदक्षिणा संपते त्या मार्गातून काही अंतर आम्ही पार केले.
या ठिकाणी मोठ्या कातळात समुद्राने मोठी कला निर्माण केली आहे. लाखो-कराडो वर्षांपासून येथील कातळाला समुद्राच्या लाटा व वाºयामुळे नक्षीदार जाळी, पॉटहोल्स तयार झाले आहेत. किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे निसर्गाने कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील ओळखले जाते. मात्र, काही ठिकाणी लाटा थेट अंगावर येत होत्या. तेव्हा हा नाद काही परवडण्यासारखा नाही हे समजून आम्ही परतलो. येथे लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो.
एक धोक्याच्या सुचना:
हरीहरेश्वरचा समुद्रकिनारा हा बाहेरुन बघायलाच उत्तम आहे. यात पोहण्यासाठी उतरू नये त्याकरता येथून जवळच असलेला दिवेआगरचा किनारा उत्तम आहे. प्रदशिणा मार्ग भरती व ओहोटीमुळे नेहमीच आकर्षित ठरतो. पण येथील स्थानिकांचा सल्ला ऐकूनच पुढे जावे. कधी जोरदार लाट येऊन कुणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यात त्त्या खडकात झालेल्या कपारींमुळे जीव वाचण्याची शक्यता शून्य आहे. वर्षभरात या ठिकाणी अनेक पर्यटक मृत्यूमुखीही पडतात.
श्रीवर्धन
श्रीवर्धन हे ऐतिहासिक ठिकाण आहे. 16 व्या, 17 व्या शतकात हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रथम अहमदनगरचा निजाम आणि नंतर विजापूरचे आदीलशाह यांनी महत्त्वाचे बंदर म्हणून असलेले महत्त्व ओळखून त्याचा वापर केला होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मगांव. मात्र सध्या श्रीवर्धन येथील या पेशव्यांच्या पुतळ्याखेरीज येथे काहीही राहिले नाही. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा प्रेक्षणीय आहे. मात्र, वेळेअभावी मी तो पाहिला नाही.

वेळास किनारा
संध्याकाळी दिवेआगरपासून जवळच सुमारे १५ किलोमीटर असलेल्या वेळासचा किनारा पाहण्यासाठी गेलो. प्रत्येक समुद्रकिनारा हा काही ना काही तरी वेगळेपण जपत असल्याचे दिसते. त्याप्रमाणे वेळासला कासवांचे नैसर्गिक प्रजोत्पादन होते. फार पूर्वी या कासवांच्या अंड्यांची चोरी तसेच खाण्यासाठी त्याचा वापर केला जाई. पर्यावरणप्रेमींनी याला आळा घालत कासवांच्या अंड्यांची जपणू केली आहे. एका मोठ्या दगडावर स्थानिकांनी मंदिर बांधले आहे. ते पाहण्यासारखे आहे.
दिवेआगरला जाताना भरडखोल नावाचे गाव आहे. या ठिकाणी मासेमारी चालते.
दिवेआगर :
हरिहरेश्वरला रामराम करून आम्ही दिवेआगरला जाण्यासाठी निघालो. हे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटरचे आहे. दिवेआगरला जाण्यासाठी दोन मार्ग जातात. एक शेखाडीगावातून जो समुद्रालगतच दिवेआगरला जातो. तर दुसरा बोर्लिपंचतन मार्गे यात शेखाडीगावातून जाणारा रस्ता पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो. कारण एका बाजूला छोटे डोंगर तर दुसºया बाजूला दिवेआगरपर्यंत समुद्रकिनारा असा हा रस्ता आहे. वाटेत श्रीवर्धन, वळवटी, अरवी समुद्रकिनारे आहेत. प्रत्येक किनाºयावर थांबणे शक्य नसल्याने नेत्रसुख घेत आम्ही दिवेआगरला पोहोचलो. आधिच राहायची सोय केली असल्याने जागा शोधण्याची अडचण नव्हती.
दिवेआगर पाहाण्यासारखी ठिकाणे
दिवेआगर नारळ, सुरू आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या किनाºयासाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारा शांत आहे. निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात. सर्व समुद्रकिनाºयावर दिसणारे विविध खेळ जसे बोटिंग, पॅरासेलिंग, बनाना राईडस, घोडेस्वारी आनंद इथे लुटता येतो. येथील सी-फुड म्हणजेच मासे आणि इतर कोकणातील स्थानिक पदार्थ खूपच प्रसिध्द आहे. हे ठिकाण उकडीचे मोदकासाठी प्रसिद्ध आहे. कोकणची खासियत म्हणजे नारळी, पोफळीची बने, आंबा, फणस, सुपारी साठी दिवेआगर प्रसिद्ध आहे. रोठा सुपारीचे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते.
रुपनारायण मंदिर
दिवेआगरला श्री सुवर्ण गणेश मंदिर तसेच रुपनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. सुवर्ण गणेश मंदिरातील गणपतीच्या सोन्याचा मुखवटा प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी येथील मुखावटा चोरीला गेला होता. तो परत मिळाला. मंदिरात सध्या आपल्याला तो पाहायला मिळतो. रुपनारायण मंदिरातील मूर्ती आकर्षक असून, उंच आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती एकच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दशावतार कोरले आहेत. मंदिरा बाहेरील विहीरीची रचना देखील सुंदर आहे.
पर्यटनासाठी उत्तम काळ
दिवेआगरला हिंडायला जाण्याचा काळ म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात येथील तापमान जास्त थंड असते. कारण जून ते आॅक्टोबरपर्यंत पाऊस असतो. तर उन्हाळा प्रचंड गरम आणि दमट असतो. आॅक्टोबर ते मार्च असा कालावधी नक्कीच सुखकारक ठरेल.
कसे पोहचाल :
दिवेआगर या ठिकाणी रस्त्याने तसेच रेल्वे मार्गाने जाता येते. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे, श्रीवर्धन आणि पनवेल येथून दिवेआगरसाठी मिळतात. तसेच स्व:ताचे वाहन असल्यास मुरुड जंजिरा पाहून दिघी येथून जेट्टीने देखील प्रवास करता येतो.
राहण्याची सोय :
समुद्रकिनाºयालगतच्या जवळ असलेल्या बहुतांश ठिकाणी ‘होम स्टे’ अर्थात स्थानिक रहिवाशांच्या घराच्या शेजारी बांधलेल्या रुम्समध्ये पर्यटक राहू शकतात. एसीची सोय, गरम पाण्याची सोय या ठिकाणी असते. तसेच पुणे-मुंबईकडच्या धनाढ्य लोकांनी येथील जमिनी विकत घेऊन त्यावर अलिशान हॉटेल्स देखील बांधलेली आहेत. अर्थात त्यामध्ये राहण्यासाठी चांगलेच पैसे मोजावे लागतात. ‘होम स्टे’मध्ये १५०० ते २००० असे दर आकारले जातात. अर्थात पर्यटन काळात हे दर कमी जास्त होऊ शकतात. अनेक घरातून निवासाची तसेच भोजनाची सोय होऊ शकते. गाव छोटे असल्याने मोजकीच हॉटेल्स आहेत.
Sunday, November 18, 2018
चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही : सिंधुदुर्ग किल्ला
‘चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही’, असे ज्या किल्याचे वर्णन छत्रपती शिवाजीमहाराजांनी केले तो म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला. ज्याची समुद्रावर सत्ता असेल तो आजुबाजूच्या प्रदेशावरही सत्ता व व्यापार करू शकतो. हे ओळखलेल्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला उभारला. मुरुडच्या जिंजिºया किल्याच्या तोडीसतोड असलेला हा किल्ला. सिंधुदुर्गाची बांधणी अप्रतिम अशी करण्यात आली आहे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा किल्ला बांधताना विचार केला आहे. त्या विषयी....
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे’ बेटावर खडक, चारही दृष्ट्या मोक्याची जागा व त्यावर असलेली गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की, या जागी बुलंद किल्ला वसवावा चौºयांशी बंदरी ऐशी जागा नाही! आणि ‘सिंधुदुर्ग’ नावाचा सागरी अभेदय किल्ला साकार झाला. छत्रपतींनी बांधलेल्या या किल्यामुळे मराठ्यांच्या नौदलाला एक मोठे बळ मिळाले. कारण तोपर्यंत समुद्रावर केवळ इंग्रज, पोतुर्गीज, डच, आदिलशहा, सिद्दी व पोतुर्गीज, चाचे यांचाच वचक होता.
‘अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे महाराजांस प्राप्त झाले’ या चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्याचे महत्त्व खरोखरच आजही आपल्या पहावयास मिळते.
अफजलखानाला मारल्यावर छत्रपतींनी आदिलशहाची ठाणी काबीज केली. महाराज त्यानंतर मालवण किनाºयावर आले. त्यावेळी कोकणाची स्थिती अत्यंत भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, अमानुष अत्याचार, फुटणारी देवळे, स्त्री-पुरुषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून होणारी रवानगी हे प्रकार रोजचेच होत होते. या सर्वांना कुठेतरी खीळ बसावी यासाठी महाराजांनी किल्ला बांधणीची मुहूर्तमेढ रोवली.
२५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ला बांधणीस सुरूवात झाली तर २९ मार्च १६६७ मध्ये किल्ला पूर्ण झाला. दि. २४ नोव्हेंबर १६६४ ला मालवणच्या किनाºयावरील ‘मोर्याचा धोंडा’ या खडकावर गणेश, शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि नंदीची शिल्पं कोरून गणेशपूजनाचा सोहळा पार पडला. सिंधुदुर्गाच्या या बांधकामासाठी त्याकाळी एक कोटी होन एवढा खर्च आला. छत्रपतींनी यासाठी अख्खी सुरत लुटली. त्या लुटीतून रायगडचे स्थापत्यकार हिरोजी इंदूलकर यांच्या देखरेखीखाली स्वराज्याची शिवलंका आकार घेऊ लागली. स्वत: महाराजांनी, जिजाऊ माँसाहेबांनी या बांधकामात लक्ष घातले होते. दरम्यानच्या काळात महाराजांना आगºयाला जावे लागले. औरंगजेबाने महाराजांना नजरकैद केले. या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. परंतु किल्याचे बांधकाम जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
मालवणपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या या कुरटे बेटावरील सिंधुदुर्ग किल्लयावर जाण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो. ९० रुपये प्रति व्यक्ती असे या होडीचे जाऊन-येऊन भाडे आहे. १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये असा दर आहे. येथे सुमद्र शांत, सुंदर व स्वच्छ पाणी असल्याने आजुबाजूचा परिसरही देखणा आहे. लहान-लहान होड्या, नारळाची झाडे, नीळे पाणी असे पाहत आपण सुमारे दहा ते पंधरा मिनिटातच किल्याच्या प्रवेशाद्वारासमोर येऊन पोहचतो. प्रवेशद्वारातून आत जाताना ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय...’, ‘जय भवानी जय शिवाजी...’’ अशा घोषणा देत अनेक पर्यटक किल्यात प्रवेश करतात. समुद्राच्या आत ऐवढा मोठा किल्ला व त्यावर एवढे पर्यटक पाहून आपणही आश्चर्यचकित होऊन जातो. आत गेल्यावर किल्याची माहिती सांगण्यासाठी खासगी गाईड आपले स्वागत करतात. खरेतर स्वत:हून किल्ला पाहण्यात आनंद आहे. पण ज्यांना किल्याची व इतर माहिती माहित नसते त्यांनी या गाईडचा आधार घेतला तर काहीच हरकत नाही. ५ जणांसाठी २०० रुपये घेऊन आपल्याला ते किल्यातील महत्त्वाच्या गोष्टी, किल्याचा इतिहासाबद्दल माहिती सांगतात.
मुख्य दरवाज्याची बांधणी दोन बुरुजांच्या बांधणीतून केली आहे. सहजरित्या शत्रंूला दरवाजा कोठे आहे हे न समजण्यासाठी असे बांधकाम केलेले आहे. शत्रूने जर हल्ला केला. तर त्याने केलेल्या तलवारीचा वार हा आपल्यावर थेट न घेता तो वार बुरुजावर जाईल मात्र, आपण किल्याच्या आतून केलेला वार मात्र, त्याच्यावर थेट होईल. प्रवेशद्वारावर पोहचोस्तोवर येथील दरवाजाचे अस्तित्वच दिसत नाही. संपूर्ण किल्याला हेच एकमेव प्रवेशद्वार आहे. वरील बाजूस जांभ्या दरवाजाचा नागरखाना असून, शत्रू आल्यास नगारा वाजवून संपूर्ण किल्यावर संदेश देण्यासाठी याचा वापर होई. सध्या जरी येथे बोटी येण्यासाठी धक्का बांधला असला तरी पूर्वीच्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किल्यात प्रवेश करणे अवघड जात असावे हे नक्की. संपूर्ण किल्ला सुमारे ४८ एकरात बांधलेला असून, ४ ते ५ किलोमीटरची तटबंदी आहे. २० ते ३५ फूट उंचीची तंटबंदी आहे. तटबंदी ८ ते १० फुट रुंद आहे. दक्षिणमुखी मारुती दरवाज्यातच आहे. प्रवेशद्वारासमोरच जरवरी मातेचे मंदिर हे येथील प्रसिद्ध मंदिर आहे. जर म्हणजे आजार आजारांवर मात करणारी ही माता आहे. २५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ला बांधणीस सुरूवात झाली तर २९ मार्च १६६७ मध्ये किल्ला पूर्ण झाला. आजच्या काळात किल्ला बांधण्यास ३२ हजार कोटी खर्च आला असता. प्रवेशद्वारानंतर काही अंतरावर छत्रपती शिवाजीमहाराजांचे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजीमहाराजांची मूर्ती स्थापन केली आहे. या शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजीमहाराजांची मूर्ती असून, अंगवस्त्र चढवलेली आहेत. हातामध्ये कडा, डोक्यावर चंद्राची कोर, भवानी तलवारीची प्रतिकृतीची तलवार येथे ठेवण्यात आली आहे. मंदिरात फोटो काढण्यास बंदी आहे. १९०७ मध्ये कोल्हापूरचे शाहूमहाराजांनी सभामंडपाचे काम पूर्ण केले. संध्याकाळी येथे महाराजांना नौबत वाजूवन मजुरा करण्याची प्रथा आहे. किल्यावर महाराजांच्या वेळी किल्याची देखरेख करण्यासाठी असलेली काही कुटुंबे आजही राहतात. गडावर १८ कुटुंबांची वस्ती आहे. सपकाळ, सावंत, भोसले, जैन, यादव, पडवळकर, फाटक, वैंगणकर, मजुवर अशी वस्ती आज देखील येथे राहते. गडावर त्यांची सध्या ९ वी पिढी राहत आहे. तसे किल्यावर सूर्यास्तानंतर एतरांना राहण्याची परवानगी नाही.
किल्याचे बांधकाम :
शिसे, चुना, वाळू, गुळ, उडीद, भेंडी अशा पदार्थांच्या वापरातून तटबंदीच्या वापरासाठी केला आहे. शिसेच्या वापर पाया भरणीसाठी केलेला आहे. गडावर धान्य कोठार देखील आहे. नागमोडीच्या आकाराची तटबंदी पाहण्यासारखी आहे. सुमारे ५२ बुरूज येथे उभारलेले आहे. तटबंदीतच ४० शौचकुपे देखील बांधलेली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेली शौचकुपे इतरत्र आढळत नाहीत. तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. पूर्वी प्रवेशद्वारातून पुढे डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड होते. विशेष म्हणजे या झाडाला दोन फांद्या होत्या आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागलेले असायचे. परंतु २००७ च्या पावसाळ्यात त्यावर वीज पडून ते झाड मेले. आणी आता मात्र, तेथे काहीही नाही. दुर्देव.
गडावर शंकराचे एक मंदिर असून, पूर्वी या ठिकाणी गुप्त विहीर होती. जी समुद्राखालून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर या ठिकाणी जात असे. मात्र, सध्या ती विहिर बंद करण्यात आली असून, केवळ वरूनच आपल्याला त्याचे दर्शन घडते. तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. पण वेळे अभावी आपल्याला ती शक्य होत नाही. गडावर आपल्याला नाष्टा, पाण्याची सोय होते.
दहिबाव, दूधबाव व साखरबाव
किल्याचे वैैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने समुद्राचे खारे पाणी असून देखील आतमध्ये गोड्या पाण्याची तीन विहिरी आहेत. आजही या गडावर येथील स्थानिक लोक हेच पाणी पितात. या तीनही विहिरींची नावे सुद्धा फारच गोड आहेत. दहिबाव, दूधबाव व साखरबाव अशी त्यांची नावे आहेत. पंचामृतामध्ये असलेल्या या तीन गोष्टींमुळे अजूनच गोडवा तयार होतो. तिन्ही विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. असा आकार देण्याचे कारण म्हणजे एक तर शिवाजीमहाराज शिवभक्त होते. व दुसरे कारण म्हणजे शिवलिंगआकाराने सूर्याची किरणे थेट पाण्यात पडत नाही. व त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही लवकर होत नाही. संपूर्ण जांभा दगडामध्ये असलेले बांधकाम आहे. गडावर ताराराणी व राजाराम याचा वास्तव्य असलेला एक वाडा होता. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. बिट्रीशांनी येथील राजवाडा तोडून भुईसपाट केलेला आहे. महाराजांची स्फूर्ती घेऊन पुढे कोणीही महाराजांसारखे कर्तृत्व करू नये यासाठी इंग्रजांनी केलेली ही सोय होती. गडावर भवानी मातेची मूर्ती असून, काळ्या पाषाणाची ही मूर्ती आहे. निशाण काठी म्हणून येथे एक जागा आहे. ही किल्याची सर्वात उंच असलेली जागा याला टेहळणी बुरूज म्हणून देखील म्हणतात. सभोवताली नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जाईल. नुसत्या डोळ्यांनी देखील वेंगुर्ला परिसर, मालवण परिसर, निवतीचा किल्यापर्यंत नजर ठेवता येई.
खंत :
सध्या मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ भव्य, उंच असा पुतळा उभारण्याचे सरकारचे स्वप्न आहे. मी हा पुतळा बांधण्याच्या विरोधात आहे. पुतळा उभारण्यासाठी कितीतरी कोटी रुपये खर्च होईल आणि एवढे पैसे खर्च करून काय मिळणार आहे? एकीकडे छत्रपतींचे भव्य दिव्य पुतळे उभारायचे व दुसरीकडे छत्रपतींचे प्रेम असलेल्या गड किल्यांची दुरवस्था होत असताना पाहायची यासारखे दुर्देव्य नाही. शिवस्मारकावर ही उधळपट्टी करण्याऐवजी छत्रपतींनी बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्यांची ढागडुजी, ढासळलेली तटबंदी पुन्हा बांधली, योग्य ते मार्गदर्शक (गाईड) ठेवले तर शिवरायांनी घडवलेला इतिहास पुन्हा एकदा आजच्या व पुढच्या पिढीला नक्की कळेल. यातूनही चांगले पर्यटन घडेल. या किल्यांची दुरुस्ती केल्यानंतर मग खरच बांधा शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ पुतळा. हेच महाराजांना अपेक्षित असेल ना...
कसे जावे :
- पुण्याहून : कोल्हापूर मार्गे सुमारे गगनबावडा मार्गे सावंतवाडी व तेथून मालवण : ४१० किलोमीटर
- मुंबईहून पेण, पनवेल, चिपळूण, लांजा, सावंतवाडी, मालवण. : ४८१ किलोमीटर
- मुंबई - पुणे - कोल्हापूर - मालवण : ५३३ किलोमीटर
राहण्याचे ठिकाण :
- तारकार्ली बिचवर एमटीडीसीची निवास्थाने आॅनलाईन बुकिंग करता येऊ शकतात. एसी / नॉन एसी सुमारे २ ते ३ हजार रुपये एक दिवसासाठी असा दर आहे. या शिवाय मालवण परिसरात स्थानिक लोकांच्या घराच्या परिसरात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या खोल्यांमध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होते. अंदाजे १ ते २ हजार रुपये असा एका दिवसाचा खर्च आहे.
- मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला बोटीने : ९० रुपये प्रौढांसाठी तर ५० रुपये १२ वर्षांखालील.
- पार्किंगसाठी : ५० रुपये कार
या शिवाय :
- स्कुबा ड्राव्हिंगचा अनुभवही आपण या ठिकाणी घेऊ शकतो. माणसी ६०० रुपये असा खर्च आहे.
वरील लेख आपल्याला कसा वाटला या विषयी येथे जरूर लिहा.....
Subscribe to:
Posts (Atom)