Tuesday, September 3, 2024

‘मातेचे रान’ अर्थात माथेरान -भाग २

पिंपरी चिंचवडहून सुमारे 110 किलोमीटर लांब असलेल्या माथेरानला भेट देण्याची ही माझी सहावी वेळ. शनिवार व रविवार येथे पर्यटकांची मोठी जत्राच भरते. अरुंद रस्त्यांमुळे व
घाट असल्याने या ठिकाणी तासनतास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वाहतूककोंडीत अडकलेल्या पर्यटकांना घर सोडून येथे कशाला आलो असेच वाटत
असते. त्यामुळे खास सुट्टी घेऊन या ठिकाणी गेलो.
तुरळक पर्यटक असल्यामुळे माथेरानचा आमचा प्रवास मस्त झाला. त्या विषयी.......







एक प्रमुख पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन म्हणून माथेरानकडे पर्यटकांचा ओढा असतो. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण. मुंबई पुण्यातून सहलीसाठी सर्वांत जवळचे आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. उंचीच्या विस्तीर्ण पठारावर माथेरान वसले आहे.  इंग्रजांनी माथेरान वसवले, म्हणूनच इथल्या काही ठिकाणांना इंग्रजीत नावं दिलेली आहेत. माथेरानचा संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि कोकणात पहावयास मिळते तशी लाल माती यांनी भरलेला आहे.  


गाडी पार्किंग करतानाच येथे घोड्यावरून प्रवासी वाहतूक करणारे गाडी शेजारीच खेटून वाहनतळापर्यंत पोहचले. नको नको म्हणत असताना देखील घोडयावरून जाणे कसे फायद्याचे आहे. याचे  महत्व सांगू लागला. मी अनेकवेळा येथे आलो असल्याचे सांगून देखील मलाच खोटे ठरवत तुम्ही किती पैसे द्याल ते सांगा असे विचारू लागला. वरून पाऊस पडत होता. मला बाजारपेठेत जाण्याची घाई झाली होती. शेवटी त्याला ५० रुपये हातावर टेकवून सुटका करून घेतली. ई-रिक्क्षा सुरू झाल्यामुळे चालत, घोड्यावरून जाण्याचा मार्ग पर्यटक  अवलंबत नाही. ई-रिक्क्षा आल्याने अनेकजणांचे धंद्यावर गदा आली हे मात्र खरं. वाहनतळापासून मुख्य बाजारपेठ सुमारे २.५ किलोमीटर. येथे जाण्यासाठी पर्याय ही खूप आहेत. सुमारे 20 ई-रिक्क्षा येथे असतात. साधारणपणे 15 मिनिटांत आपण मुख्य बाजारपेठेत पोहचतो. ई-रिक्क्षेसाठी 35 असा दर आहे. मूळचा मातीचा कच्चा रस्ता सध्या पेव्हींग ब्लॉक्स टाकून तयार करण्यात आला आहे. ई-रिक्क्षेसाठी ही सोय करण्यात आलेली आहे. मात्र यामुळे घोड्यांना चालताना त्रास सहन करावा लागातो. पेव्हींग ब्लॉक्स  घसरडे होऊन त्यावरून घोडा पडण्याचे प्रकार देखील होत आहे. 


एकाची सोय ही दुसऱ्याची गैरसोय 

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले माथेरान नेहमीच त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे चर्चेत असतं. पण सध्या येथील वातावरण गरम झाले आहे. हा वाद म्हणजे माथेरानमध्ये ई रिक्षा आणि घोडे चालक यांच्यातील आहे. माथेरानमध्ये फार पूर्वीपासून हातरिक्षावाले आणि घोडेचालक आहेत. हे ठिकाण इको सेन्सेटीव्ह झोन असल्यामुळे इथे कोणत्याही स्वयंचलीत वाहनाला बंदी आहे. अपवाद फक्त रुग्णवाहिकेला. माथेरानमध्ये येण्यासाठी पाच पर्याय इथले पर्यटकांसमोर उपलब्ध आहेत. एक म्हणजे ‘माथेरानची राणी’ असेलेली टॉय ट्रेन, घोडे आणि तिसरा पर्याय म्हणजे हातरिक्षा. आता त्यात ई रिक्षेची भर पडली आहे.शेवटचा पर्याय म्हणजे 11 नंबरची बस. (पायी) माथेरानमधील श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संघाने येथे ई रिक्षा सुरु  केली. यासाठी पेव्हींग ब्लॉक्स टाकले. म्हणतात एकाची सोय ही दुसऱ्याची गैरसोय ठरते.  या ब्लॉकवरती आम्ही कसं चालायचं असा प्रश्न येथील घोड्यांना पडला आहे. या ब्लॉकवरती घोडे पळवतासुद्धा येत नाही.  जर घोडा जोरात चालवला किंवा पळवला आणि घोडा स्लीप किंवा पडला व वर बसलेला पर्यटक पडला खाली, त्याला काही दुखापत झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? येथे वारंवार अपघात घडतात.  सध्या शाळेसाठी मुलांना 5 किलोमीटर चालत जावं लागतं. त्यामुळे या ई रिक्षाचा याचा फायदा होत आहे. 











मुख्य बाजारपेठेत पोहूचन जेवण उरकले. मग हनीमुन पाईंटस, इको पाईंटस येथील धबधबा पाहण्यासाठी गेलो. अतिशय सुंदर, डोळ्याचे पारणे फेडावा असा हा धबधबा पाहून येथे येण्याचे कष्ट विसरायला होते. याबरोबरच येथे असणारे शिवसंग्रहालय हे पाहण्यासारखे आहे. नाममात्र १० रुपये असा दर आहे. प्रत्येक पर्यटकाने हे आवर्जून पहावे.  या शिवाय मंकी पॉइंट, शिवाजीज लॅडर , वन ट्री हिल पॉइंट, इको पॉइंट सनसेट पॉइंट अलेक्झांडर पॉइंट, हनिमून हिल पॉइंट,  खंडाळा पॉइंट  आणि किंग जॉर्ज पॉइंट ही इथली प्रसिद्ध स्थळे आहेत.  मात्र वेळे अभावी मला हे सर्व परत पाहता येणे शक्य नसल्याने संध्याकाळ होता होता आम्ही परतीचा प्रवासाला लागलो. 


















तिकीटाचा दर : 

प्रौढ व्यक्तीस ५० रुपये तर लहान मुलांना : २५ रुपये असा टिकीटाचा दर आहे. कार पार्किंगसाठी 100 रुपये दिवसभर असा दर आहे.  
घोड्यावरून प्रवास : येथे पुष्कळ पाइंटस असल्यामुळे तेथे जाण्यासाठी वेगवेगळा दर आहे. एका घोड्यावरून 350 असा कमीत कमी दर आहे. घोडेवाल्याशी घासाघीस करून आपण दर ठरवू शकतो. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी पायीच सर्व पाहता येणे शक्य आहे. या शिवास ई-रिक्क्षा व हाताने ओढण्याच्या रिक्क्षेने देखील आपणास मुख्य बाजारपेठेत जाता येते. वाहनतळापासून सुमारे ३ किलोमीटरचा हा प्रवास असतो. वाटेत दस्तरी मार्केटपर्यंत आपल्याला टॉय ट्रेन देखील मिळते. मात्र याचे डबे कमी असल्यामुळे अनेकवेळा गाडी फुल्ल होते.




इथला हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, पावसाळ्यातील कोसळणारे धबधबे माथेरानच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर घालत असतात. त्यामुळे  एकदा तरी येथे निसर्गाचा आनंद लुटण्यास जावे.




शिवसंग्रहालय














कसे जावे :

पुण्याहून : 
पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी साधारण ३-४ तास लागतात. पुण्याहून जाताना खोपोलीतून चौक गावातून माथेरानला गाडीने जाता येते. तसेच कर्जत ते माथेराना अशी एसटी सेवा देखील उपलब्ध आहे. कर्जत येथून भाडे ठरवून कारने देखील जाता येते साधारणात: ५०० ते 1000 असा सिजन पाहून दर ठरवला जातो. मात्र स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास हा प्रवास सोईचा ठरतो. 

मुंबईहून : 
बदलापूर-कर्जत रस्त्याने मुंबईहून नेरळला पोहोचता येते. इथून माथेरानला जाण्याचा मार्ग आहे. 
माथेरानला रेल्वेनेही जाता येते. मुंबईहून कर्जतला उतरून हा प्रवास करता येतो. माथेरानला जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ. नेरळ ते माथेरान हे अंतर १० किमी आहे.

टॉय ट्रेन-
माथेरानला जाण्यासाठी नेरळ इथुन दोन फूट रुंद नॅरो गेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन सुरू होते, हा सर्वोत्तम पर्याय आहे. टॉय ट्रेन प्रवाशांना डोंगरातील वळणदार मार्गातून नेत माथेरान मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते. मात्र पावसाळ्यात ही सेवा बंद असते. 

या आधी माथेरानवर लिहले असल्यामुळे जास्त न लिहता खालील लिंकवर क्लिक करावे.

माथेरान भाग १

2 comments:

Anonymous said...

खूपच छान माहिती

Anonymous said...

सुंदर माहिती

कॉपी करू नका