काही इतर पाने

Sunday, November 17, 2013

‘मातेचे रान’ अर्थात माथेरान

निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील  सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व  जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.

‘मातेचे रान’

 ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.
माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर  १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.

पार्इंट (स्थळे) :

 इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.



वाहनांना बंदी :

माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी  वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.
        बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.



लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’










वनश्री :

संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा,  हिरडा, खैर,  जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.







शार्लोट लेक

मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात.  या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.

शार्लोट लेक












बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.


प्रदूषणापासून  मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे. 

 

माकडेच माकडे :

माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.

‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’

कसे जाल :

  • माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११०  किलोमीटरवर आहे.
  • पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
  • (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
  • पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी   नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.

कधी जाल :

येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.

काही टिप्स :

  • शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
  • सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
  • स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
  • पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)

माथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.

10 comments:

  1. एवढ्या जवळ असलेल्या माथेरानवर आतापर्यंत जाणे झाले नाही. तू दिलेली माहितीवाचून नक्कीच जाणार आहे. छान वर्णन. सूर्यप्रकाशातील तुझाच काढलेला फोटो व माकडांच्या परिवाराचा फोटो आवडला.

    ReplyDelete
  2. पुढची ट्रीप नक्कीच माथेरान ला... खूपच छान वर्णन...

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख आणि सुरेख वर्णन

    ReplyDelete
  4. निशिकांत तुम्ही खूप छान माहिती दिली खरच तुही जे वर्णन केले हे वाचून मी नकीच माथेरान ला जाणार आहे 😊☺

    ReplyDelete
  5. प्रति,
    निशिकांतजी सप्रेम नमस्कार.
    मी श्री. प्रविण पारसे
    मी एक सांगली जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षक आहे.

    तुमचा लेख वाचला आणि खूप छान वाटले. कारण माझ्या शाळेची सहल माथेरानला नेण्यासाठी माझे सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्यातच गुगल वर माथेरान ची माहिती शोधत असताना अचानक तुमचा ब्लॉग सापडला. तुमची माहिती मी खूप मनापासून वाचली खूप छान वाटले. कारण प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे निर्देशन केले आहे.

    धन्यवाद..

    शालेय सहलीबद्दल मार्गदर्शन करावे

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.