मोरया मंगलमूर्तीवाडा
श्री मोरया गोसावी हे नाव महाराष्ट्राच्या संतांमध्ये अनेक शतकांपासून ओळखलं जातं. आजही जनसामान्यांमध्ये याविषयी खूप श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून पुण्याजवळील चिंचवडला महत्व प्राप्त झाले आहे ते येथील श्री मोरया गोसावी मंदिरामुळे. चिंचवडगावात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक श्री मोरया गोसावी यांचा मंगलमूर्तीवाडा.
चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर चिंचवड स्टेशनपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. आधुनिक काळानुसार चिंचवडगाव ही बदलले आहे. मोठमोठ्या इमारती, मोठे पुल उभे राहू लागले आहे. मात्र आजही आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम येथील मंदिरे करत आहेत. हे एक जागृत गणेशस्थान आहे. मंगलमूर्ती वाड्याला देऊळवाडा असेही म्हणतात. मोरया स्वामींनीही देऊळ मळ्यात समाधी घेतली. पवना नदीच्या किनारी असलेला हा वाडा मोठा प्रशस्त असून, आजही वाडा सुस्थितीत पाहावयास मिळतो ते येथील चांगल्या व्यवस्थापनामुळे.
वाडा एका उंचवट्यावर उभारलेली वास्तू आहे. आत प्रवेश केल्यावर समोर मंगलमूर्तीचा सभामंडप दिसतो. प्रवेशद्वाराच्या शेजारी संस्थेचे कार्यालय आहे. कार्यालयाशेजारी वेदशाळा आहे. या शेजारी दुमजली इमारत आहे. समोरच लाकडी सभामंडप दिसून येतो. लाकडी बांधकाम असलेले कठडे या ठिकाणी दिसतात. येथे मंगलमूर्तीचे देवघर असून, शेजारी शमी वृक्षाचे झाड आहे. पूर्वी या वाड्याला तट होता. तसेच चार बुरूज होते. आज फक्त शेजारी असलेल्या धनेश्वर मंदिराच्या बाजूचा एक बुरूज आपणास दिसतो. बाकीचे बुरूज काळाच्या ओघात पडझड झाल्याचे दिसून येते. १७०० शतकाच्या सुरूवातीला हा वाडा बांधला गेला असावा. इ.स. १६७५ मध्ये वाड्याची डागडुजी होऊन नवीन बांधकाम केले.
मुख्य मंदिरात श्री मोरया गोसावी महाराजांच्या प्रतिमा रेखाटलेल्या आहेत. उजव्या बाजूला अष्टविनायकांचे दर्शन घडते. या प्रतिमांमध्ये मोरया गोसावी यांच्या जीवनपटातील काही प्रसंग रेखाटलेले आहेत. सभामंडप छान व कोरीव नक्षीकाम केलेला आहे. या मंडपात अनेकवेळा शास्त्रीय संगीत, भजने यांचे मोठे कार्यक्रम होतात. मुख्य मंदिरातील गणेशमूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली.
श्री मोरया गोसावी
श्री मोरया गोसावी यांचे मूळ घराणं कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील शाळी या गावाचं. त्यांचे मूळ पुरुष लाहेभट - दायंभट, कानभट, सायंभट - वामनभट. वामनभटांना मूलबाळ नव्हते. वामन नारायण भट सन 1330 मध्ये आपल्या पत्नीसह सासवड, जेजुरीजवळील मोरगावला आले व तिथल्या देवाची मोरयाची भक्ती करू लागले. ते स्वत गणेशभक्त होते. मोरगाव येथील कºहानदीच्या काठी त्यांनी श्रींची सेवा केली. त्यांना सन 1375 मध्ये एक मुलगा झाला, त्याचे नाव होते त्यांनी मोरया ठेवले. मोरया एक दिवस आजारी पडला. त्याचा आजार बरा होत नसल्यामुळे आई वडीलांनी श्रींची आराधना सुरू केली. याच काळात एका साधुने येऊन मोरयावर उपचार केले. त्यामुळे मोरयाचे प्राण वाचले. त्या गोसाव्याने मोरयास गुरू उपदेश केला व तेव्हापासून या भट घराण्यास ‘गोसावी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
भाद्रपद चतुर्थी 1492 ला कºहा नदीत स्नान करत असताना गणपती दिसला तो त्यांनी चिंचवड येथे आणून मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे त्यांनी ताथवडच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या मुलीबरोबर विवाह केला होता व त्यांना मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी 'चिंतामणी' ठेवलं. मोरया गोसावींनीही आपले कार्य संपले असा निश्चय करून सन 1561 मध्ये पवना नदीच्या काठी वयाच्या 187 व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. श्री मंगलमूर्ती वाडा ते मोरया गोसावी समाधी मंदिर मंगलमूर्तीची द्वारयात्रा निघते. सध्या मंदिराचा कार्यभार देवस्थानाचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र उर्फ कुमार देवमहाराज पाहतात.
अष्टविनायक स्थानांपैकी मोरगाव, सिध्दटेक व थेऊर या देवस्थानांची व्यवस्था चिंचवडच्या या देवस्थानामार्फत पाहिले जाते.
कसे जाल :
- जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे बिग बाजार नंतर डावीकडून वळून पुलावरून चापेकर चौकात. तेथे बाजारपेठेतून मोरया वाड्याकडे जाणारा रस्ता .
- अंदाजे अंतर : पुणे - चिंचवड गाव १८ किमी.
- चिंचवडस्टेशनला उतरून चिंचवडगावात जाण्यासाठी बसेस, रिक्षा उपलब्ध आहे.
काय पहाल :
- क्रांतितीर्थ चापेकर वाडा
- थेरगाव येथील बोटक्लब
- धनेश्वर मंदिर
वेळ असल्यास पिंपरी - चिंचवड शहरातील आजुबाजूची ठिकाणेही १ दिवसात पाहता येणे शक्य आहे.
मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे. व्यवस्थापनाने ‘फेरफटका’ ब्लॉगविषयी माहिती जाणून घेऊन त्यानंतर फोटो काढण्यास परवानगी दिली. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.